आमचं ध्येय:
माहितीपटाचे उर्वरित शूटिंग आणि पोस्ट-प्रोडक्शन पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी – रु. २५,००,०००/- (पंचवीस लाख रुपये)
मारुती चितमपल्ली यांना निसर्गाच्या सहवासात नेमकं काय गवसलं? हे आपल्याच नाही तर पुढच्या पिढीला सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. निधी गोळा करण्यासोबतच आमचा हेतू निसर्ग संवर्धक, वाचक, लेखक आणि सामान्य नागरिक ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला अपरिचित असं जंगलांचं जग समजून घेणं हा आहे.
प्रोजेक्ट स्टेज:
माहितीपटाच्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये साधारण मारुती चितमपल्लींशी साधलेला १७ तासांचा संवाद आहे. संकलन चालू आहे.
“कॉर्बेट एक हंटर होता, ‘शिकारी’, ज्याने जंगलाकडे शिकारीच्या दृष्टिकोनातून पाहिलं. यात शंका नाही की त्याचं जंगलांवर प्रचंड प्रेम होतं पण जंगलाशी असलेलं त्याचं नातं आणि माझं नातं खूप वेगळं आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही प्राणी मारला नाही. मी स्वतःला कसं मारू शकतो?” – मारुती चितमपल्ली
या माहितीपटामध्ये ते जंगलांशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल सांगतात. जंगलाने त्यांना काय दिलं आणि त्यांनी जंगलाला काय दिलं ह्याचे अनुभव ते कथन करतात . जे विलक्षण आहेत. त्यांच्या दृष्टीने जंगल समजून घेऊन आणि सगळ्यांना त्या जंगलाच्या जवळ घेऊन जायचं आहे. कदाचित त्यात आपल्याला आपलं आणि जंगलाचं नातं काय आहे हे उलगडेल आणि माहितीपट संपल्यावर आपण मारुती चितमपल्ली यांनी अनुभवलेले जंगल स्वतः सोबत घेऊन जाऊ.
ह्या माहितीपटात चितमपल्लींनी अनुभवलेली अद्भुत रम्य ठिकाणं आहेत आणि इतर समकालीन लेखक, संवर्धक, संशोधक यांच्या मुलाखती आहेत. आज जंगलांच्या संदर्भात अनेक निर्णय घेतले जात असताना, त्यांच्या बचावासाठी मारुती चितमपल्ली यांची मतं, त्यांचा दृष्टीकोन खूप महत्वाचा ठरणार आहे.
मारुती चितमपल्लींवर माहितीपटाची गरज का आहे?
जंगलांशी एकरूप झालेल्या माणसांच्या अशा किती कथा आपल्याकडे सांगितल्या जातात?
एक माजी वनाधिकारी, लेखक, संवर्धक आणि पक्षीनिरीक्षक – मारुती चितमपल्लींनी अर्धाधिक आयुष्य जंगलांच्या सानिध्यात घालवलं. त्यांच्या ह्या तपश्चर्येतून ते निसर्गाशी एकरूप झाले. आज अशी किती माणसं आहेत? ते त्यांच्या लिखाणाबद्दल म्हणतात, “पक्ष्यांची गाणी ऐकल्यानंतर आणि झाडं वाढताना पाहिल्यावरच, आतापर्यंत अव्यक्त राहिलेल्या माझ्या अनुभवांना वाट सापडली.” त्यांच्या अनोख्या लिखाणातून, अनुभवांतून आपल्यालाही निसर्ग समजण्याचा मार्ग सापडू शकतो. आजच्या विनाशाच्या काळात चितमपल्लींचे विचार आणि काम लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं वाटतं.
जोखीम आणि आव्हाने.
आपल्या सगळ्यांनाच आज जंगलांचं संवर्धन होणं किती आवश्यक आहे ह्याची तीव्र जाणीव आहे आणि ज्यांना नाहीये त्यांना ती होणं अत्यंत महत्वाचं झालं आहे. हा माहितीपट लोकांना निसर्गाच्या संरक्षणाचे महत्त्व आणि त्याच्या कल्याणासाठी प्रत्येक लहान पाऊल उचलल्याने कसा फरक पडू शकेल हे समजून घ्यायला मदत करेल. जेव्हा जंगल, पर्यावरण यावर काही मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा हा माहितीपट खूप महत्वाची भूमिका बजावेल. जर हा माहितीपट पूर्ण करण्यात अडथळा आला, तर हा माहितीपट पाहून प्रेरणा घेऊन पाऊल उचलणाऱ्या त्या हजारो लोकांना आपण मुकू शकतो. ही जोखीम आपण घ्यायची का? उद्या जर जंगलांशी संबंधित कोणताही निर्णय जाहीर झाला तर आम्हाला वाटतं हा माहितीपट आपल्यापैकी प्रत्येकाला विचार आणि कृती करण्यास प्रवृत्त करू शकतो.
पण या सगळ्या प्रक्रियेत दोन मोठी आव्हानं आहेत, पहिलं म्हणजे आर्थिक आव्हान आर्थिक मदतीने आम्ही हा माहितीपट वेळेत पूर्ण करू. कारण जेव्हा गोष्ट आपल्या आवडत्या जंगलांची आहे, तेव्हा आपल्याकडे एकाच गोष्टीची कमतरता आहे ती म्हणजे वेळ. आणि दुसरं म्हणजे माहितीपट लोकांपर्यंत पोहोचणं.
यासाठीच आम्हाला तुमच्या समर्थनाची गरज आहे.
चित्रीकरणाचे ६ टप्पे आहेत:
मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या लिखाणात आणि संशोधनात आलेल्या काही दुर्मिळ जागा टिपण्यासाठी आपल्याला तीन वेगवेगळ्या जंगलांमध्ये जाणं गरजेचं आहे.
हा माहितीपट जुलै २०२२ मध्ये पूर्ण होईल, त्याच महिन्यात भारतातील वन्यजीव संस्था, काही चित्रपट क्लब आणि सेवाभावी संस्थामध्ये प्रदर्शित केला जाईल. यानंतर आम्ही विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माहितीपट आणि वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपट दाखल करण्यास सुरुवात करू.
या माहितीपटाच्या निर्मितीत सहभागी झालेले काही सदस्य चित्रपट क्षेत्राशी तर काही वन्यजीव संवर्धनाच्या कार्याशी जोडलेले आहेत. खाली नमूद केलेल्या नावांव्यतिरिक्त सुद्धा अनेक व्यक्ती या माहितीपटावर काम करत आहेत.
विपुल महागांवकर, दिग्दर्शक.
विपुल महागांवकर नाटक आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी ते आपलं चित्रपट निर्मितीचं कौशल्य आणि नाट्य क्षेत्रातला अनुभव वापरतात. त्यांना संवर्धन आणि कम्युनिटी एंगेजमेंटची पार्श्वभूमी असल्यामुळे, ते आता मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. विपुल यांनी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स [NCPA], बॉम्बे पिक्चर्स, राजेश्री प्रॉडक्शन्स यासारख्या संस्थांसोबत काम केलं आहे. ते जंगलांशी माणसाचं नेमकं नातं काय आहे, हे शोधण्यास उत्सुक आहेत आणि हे करण्यासाठी ते चित्रपट आणि नाटक यांचा एक माध्यम म्हणून वापर करतात.
उज्वल मंत्री, निर्मिती प्रमुख.
उज्वल मंत्री यांनी ‘पै पैशाची गोष्ट’, ‘स्पंदन’ या नाटकांची निर्मिती केली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सहा चित्रपट पूर्ण केले असून उज्वल मंत्री यांनी टाटा स्काय, क्लब महिंद्रा सारख्या ब्रँडसाठी अनेक जाहिरातींचं काम पाहिलं आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्या माहितीपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. ते १७ वर्षांपासून प्रतिष्ठित ‘थर्ड आय – एशियन फिल्म फेस्टिव्हल’शी संलग्न आहेत आणि १८ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय मामी चित्रपट महोत्सवासाठी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून त्यांनी काम केलं आहे.
अक्षय बापट, सिनेमॅटोग्राफर.
अक्षय बापट यांनी सेवाभावी संस्थांसाठी (NGO) साठी प्रमोशनल डॉक्युमेंट्री बनवून आपल्या चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरू केला. २००८ पासून फिल्ममेकर म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे चित्रपट निर्मितीचा विस्तृत अनुभव आहे. पूर्ण लांबीच्या माहितीपटांपासून, लघु चित्रपट, वेब मालिका आणि लहान आणि दीर्घ कालावधीचे कॉर्पोरेट प्रोजेक्ट्स त्याने केले आहेत. त्याला चित्रपटनिर्मितीच्या सर्व पैलूंचे ज्ञान आहे आणि कॅमेरा विभागात तो निपुण आहे. वन्यजीवन आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित माहितीपट निर्माण करणे यात त्याला विशेष रुची आहे .
अविनाश हरड, संशोधन प्रमुख.
अविनाश हरड व्यवसायाने शेती करत असून त्यांचे शेतीपूरक व्यवसायांचे प्रयोग सुरू आहेत. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जखमी वन्यप्राण्यांसाठी संक्रमण सुविधा सुरू केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्व आणि संग्रहालय संचनालयाच्या सहाय्याने टिटवाळा येथे संग्रहालय सुरू होत आहे. ते ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीन वाचनालये चालवतात. सध्या ठाणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.
सई गिरधारी, संशोधन प्रमुख.
सई गिरधारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात Karnataka State Biodiversity Board आणि कर्नाटक वन विभागातर्फे कर्नाटकातल्या जंगलातल्या औषधी वनस्पतींच्या जनगणनेशी संबंधित प्रोजेक्टवर काम करून केली. या प्रोजेक्टद्वारे त्यांनी भारतातील evergreen, moist deciduous, dry deciduous, scrubby forest अशा विविध प्रकारच्या जंगलांत जाऊन त्यांचा अभ्यास केला. या प्रोजेक्टनंतर त्या Terracon Ecotech Pvt. Ltd. मध्ये रुजू झाल्या. सध्या त्या Nature Conservation Foundation, Bangalore मध्ये ‘Seasonwatch’ Project Coordinator म्हणून काम पाहत आहेत. Citizen science project हा संपूर्ण भारतामधल्या कोमन सीझनल झाडांवर हवामान बदलाच्या परिणामांच्या अभ्यासाशी निगडीत आहे. सई यांचं ध्येय हे लोकांना वनस्पती संवर्धनाकडे घेऊन जाणं आहे.
डॉ. संतोष पाठारे, प्रोजेक्ट सुपरविजन.
डॉ.संतोष पाठारे यांची इनऑरगॅनिक कॅमिस्ट्री मध्ये पी.एच.डी. असून मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनचे अध्ययन केलं आहे. ते फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया [पश्चिम क्षेत्र] चे सदस्य आहेत आणि भारतातील एक प्रमुख फिल्म सोसायटी, प्रभात चित्र मंडळाचे सरचिटणीस आहेत. ‘द टेल ऑफ नेटिव्हज’ या माहितीपटाची त्यांनी निर्मिती केली आहे आणि ‘सुमित्रा भावे – एक समंतर प्रवास’ या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना बार्सिलोना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, स्पेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, दक्षिण आफ्रिका, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बेंगळुरू येथे ज्युरी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
अमोल पाठारे, क्रिएटीव सुपरविजन.
अमोल पाठारे गेल्या काही वर्षांपासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि झी मराठीसाठी प्रोमो निर्माता म्हणून काम पाहत आहेत. ‘बेस्ट एंटरटेनमेंट प्रोमो’ विभागात जय मल्हार टायटल साँगसाठी त्यांना प्रतिष्ठित ‘प्रॉमॅक्स गोल्ड’ पुरस्कार मिळाला आहे आणि जगभरातील ZEE नेटवर्कमधील अव्वल १५० कलाकारांपैकी एक म्हणून ‘ACE’ प्रशिक्षण कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या ‘पॉवर ऑफ लँग्वेज’ या चित्रपटाला गोथे इन्स्टिट्यूट्स फेस्टिव्हलच्या शॉर्ट फिल्म विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
सौरभ नाईक, संकलक.
वयाच्या १५ व्या वर्षापासूनच सौरभ नाईक यांनी चित्रपट संकलनाची आवड जोपासली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी संकलनाचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि व्यावसायिक संकलक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी टाटा पॉवरच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या ‘स्त्री शक्ती’ या मोहिमेसाठी काम केलं. त्यांनी संकलीत केलेल्या लघुपटांनी संपूर्ण भारतातील विविध प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये सुमारे १२५ पुरस्कार जिंकले आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रीय विज्ञान लघुपट महोत्सवात त्यांनी संकलित केलेला ‘कॅरी ऑन’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला.
प्रथमेश केतकर: सह-निर्माता, संवर्धक, शेतकरी.
शेतकरी असल्याने प्रथमेश केतकर ला रोजच्या जगण्यात असलेले पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजतं. त्यांनी पूर्वी चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं असल्याने चित्रपट माध्यम पर्यावरणाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावते याची त्यांना जाणीव आहे. प्रथमेशला मारुती चितमपल्ली यांच्यावर माहितीपट बनवण्याचे महत्त्व आणि स्क्रीनिंग सुरू झाल्यावर या माहितीपटाचा सामान्य लोकांवर काय परिणाम होईल याची चांगली जाणीव आहे.
Account Holder: Taleem Theatre and Films
Bank: Union Bank
Branch: Dahisar East, Mumbai.
Account no.: 510101006862918
Account Type: Current Account
IFSC: UBIN0904309
Vipul Mahagaonkar: 9867749536
Ujwal Mantri: 9833883530
taleemtheatreandfilms@gmail.com